About

                                   डांग सेवा मंडळ नाशिक संचलित,

                                   जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मुल्हेर

   डांग सेवा मंडळ नाशिक संचलित जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मुल्हेर हे बागलाण तालुक्यातील गुजरात सीमेलगत असलेले दुर्गम भागातील एक विद्यालय. मुल्हेर हे  एक ऐतिहासिक गाव असून प्रभू श्रीरामचंद्र व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे. येथे थोर संत श्री उद्धव महाराज यांचे भव्य मंदिर आहे मुल्हेर हे परिसरातील एक व्यापारी केंद्र असून आजूबाजूला 40 ते 50 छोटे छोटे पाडे आहेत. या परिसरात राहणारा आदिवासी बांधव हा मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करणार आहे. पूर्वीच्या काळी या ठिकाणी जाण्या येण्यासाठी कुठल्याही प्रकारची वाहने उपलब्ध नव्हती घनदाट असे जंगल रस्ते नाही अशा परिसरात पायी फिरत थोर समाजसेवक कर्मवीर दादासाहेब बिडकर यांनी या भागात असलेल्या आदिवासी बांधवांची परिस्थिती बघितली. शिक्षणापासून वंचित असलेल्या या बांधवांसाठी त्यांनी मुल्हेर येथे सन 1937 मध्ये डांग सेवा मंडळाची स्थापना केली. या परिसरातील बांधवांना शिक्षण देणे व त्यांचा विकास करणे हा उद्देश त्यांच्या डोळ्यासमोर होता. त्या दृष्टीने त्यांनी गोळवाड येथे पहिली शाळा सुरू केली व नंतर मुल्हेर येथे 1941 मध्ये वस्तीगृह सुरू केले. त्या माध्यमातून हळूहळू या परिसरातील आदिवासी बांधवांना शिक्षणाची सुविधा निर्माण झाली. आपल्याच परिसरात शाळा सुरू झाल्यामुळे आदिवासी बांधवांना त्या शाळेचा शिक्षणाचा लाभ मिळू लागला. पुढे 1963 मध्ये माध्यमिक शिक्षण मुल्हेरला सुरू झाले तेव्हापासून मुल्हेर ची शाळा परिसरातील विद्यार्थ्यांसाठी अत्यंत मोलाची ठरली. विद्यालयात पाचवी ते दहावीपर्यंतचे वर्ग सुरू होते. पुढे पुढील शिक्षण उपलब्ध होण्यासाठी 1969 मध्ये ज्युनिअर कॉलेज म्हणजेच अकरावीचा वर्ग सुरू करण्यात आला कर्मवीर दादासाहेब बिडकर यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केलेत. त्याला स्थानिक नागरिकांचा चांगला पाठिंबा मिळाला. पुढे दादासाहेबांनंतर डॉक्टर विजयजी बिडकर यांनी संस्थेची सूत्र हाती घेतल्यावर मुल्हेर परिसरात अधिकाधिक शिक्षणाची व्यवस्था कशी होईल यासाठी प्रयत्न सुरू केले. मुल्हेरला ज्युनिअर कॉलेजला विज्ञान शाखा नव्हती विज्ञान शाखेची सुरुवात 2012 पासून करण्यात आली. शाळा सुरुवातीला श्री उद्धव महाराज समाधी मंदिराच्या पाठीमागील आवारात भरत होती नंतर आनंदराव महाराज समाधी परिसरातील वस्तीगृहाच्या शेजारी जुन्या इमारतीत शाळा सुरू झाली पुढे संस्थेच्या सन्माननीय अध्यक्षा माननीय हेमलता ताई बिडकर यांनी ग्रामीण भागातील शाळांना शहरी शाळांचे स्वरूप प्राप्त व्हावे यासाठी सर्व सोयींयुक्त भौतिक सुविधा प्राप्त असलेल्या इमारती उपलब्ध करण्याचे काम सुरू केले. त्यानुसार मुल्हेरलाही भव्य अशी तीन मजली शाळेची नूतन इमारत तयार करण्यात आली त्यात सर्व अद्यावत सेवा सुरू करण्यात आल्या ग्रंथालय, प्रयोगशाळा, संगणक लॅब, अटल लॅब, सर्व वर्ग खोल्या अशा विविध सुविधा नियुक्त इमारत आज विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
                                  आज विद्यालयात इयत्ता पाचवी ते बारावी चे वर्ग सुरू असून पाचवी ते दहावी साठी सेमी व मराठी असे दोन माध्यम आहेत तसेच अकरावी बारावी कला विज्ञान व वाणिज्य अशा तीनही शाखा सुरू आहेत विद्यालयात आज 1769 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वर्षभरात विविध उपक्रम राबविले जातात विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधने व आदिवासी परिसरातील सर्व विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे व त्यांचा विकास साधने हे विद्यालयाचे उद्दिष्ट.